#भाग_१
ऑक्टोबर महिना आम्हा दोघांसाठी खासच आहे. एकतर लग्नाचा वाढदिवस आणि नंतर ३ आठवड्याने येणारा अमृताचा वाढदिवस. यावर्षी लग्नाचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा करुन एक मस्त सरप्राईझ अमृताने दिलं. हॉटेल बुकिंगपासून ते कुठली ठिकाणी जायचं नि काय काय पाहायचं याचं सगळं प्लॅनिंग तिनेच केलं आणि आमची एक शानदार पॅरिस ट्रिप झाली. आता "माझ्या वाढदिवशी अजून जास्त स्पेशल काहीतरी करुयात " असा हट्ट अमृताने धरला आणि मग आमचा शोध सुरु झाला आमच्या पुढच्या डेस्टिनेशनचा. ऑक्टोबर जसा सुरु झाला होता तशी ब्रसेल्समधली थंडी वाढायला सुरुवात झाली होती, आणि वातावरण अजून थंड होत जाणार याची चाहूल लागली. आम्हाला भारतातून येऊन ३ महिने झाले असले तरी उष्म्याची सवय होती. इथली थंडी झेपण्याची सवय करायची असेल तर एकदा जरा कुठल्यातरी गरम वातावरणाच्या देशात जाऊन येऊ असं ठरवलं.
अमृताच्या वाढदिवसाला लागूनच तिच्या बेस्टफ्रेंड अनिताचाही वाढदिवस येतो. मग आम्ही तिघांनी एकमताने ठरवलं कि आता अजून एका नव्या देशाची सफर व्हायला पाहिजे. स्पेन, इटली, माल्टा, ग्रीस असे पर्याय आम्ही शोधू लागलो पण सुट्ट्या आणि फिरायला जायचं ठिकाण, बजेट आणि पाहण्याची ठिकाणं यांचा ताळमेळ काही लागत नव्हता; आणि एका दिवशी अनिताला ई-मेलवर RyanAir एअरलाईन्सचं नोटिफिकेशन आलं कि पोर्तुगालला जायचं तिकीट २० युरोज इतकं स्वस्त झालंय. मग काय, अनिताने पटकन ब्रसेल्स टू लिस्बन फ्लाईट बुक पण करून टाकली. आणि पुढचं सगळं प्लॅनिंग आम्ही सोबत मिळून करायचं ठरवलं. आता जाणार आहोतच तर दक्षिणोत्तर सगळंच पोर्तुगाल बघायचं असा निश्चय केला आणि ६ दिवसांचा टूरप्लॅन ठरला.
पोर्तुगालला "युरोपातील धाडशी खलाशी" किंवा "युरोपचा दरवाजा" असंही म्हणतात. युरोपखंडाची पश्चिमेकडून सुरुवात पोर्तुगालमुळे होते. चौरस आकाराचा हा देश 'आयबेरियन द्वीपकल्पावर' वसलेला आहे. पोर्तुगालची पश्चिम सीमा अटलांटिक महासागर आणि इतर तिन्ही बाजूच्या सीमा स्पेनने वेढलेल्या आहेत. अटलांटिक महासागरात पोर्तुगालची दोन बेटं आहेत. मुख्य युरोपखंडाचं सगळ्यात पश्चिमेचं टोक 'काबो द रॉका ' आणि युरोपियन डोमेनचं शेवटचं टोक 'सांताक्रूझ-दास-फ्लोरेझ ' हे बेट पोर्तुगालच्या पश्चिमसीमेला आहे. इसवी सन १२९७ मध्ये 'डेनिस ऑफ पोर्तुगाल ' आणि 'फर्डिनांड ऑफ कास्टिले ' (पाचवा) या दोन राजांमध्ये 'अल्कॅनिसेसचा तह ' झाल्याने पोर्तुगालच्या सीमा ह्या संपूर्ण जगातील आजतागायत न बदलेल्या सीमा आहेत. अगदी यादवीयुद्ध होऊन सुद्धा पोर्तुगीझ आणि स्पेन कायम एकमेकांचे सख्खे शेजारी म्हणून राहिले आहेत. अशातही आपलं वेगळंपण जपावं म्हणून पोर्तुगालने UTC+०१:०० झोन स्वीकारला; म्हणजे तांत्रिकदृष्ट्या 'गॅलेसिया' हे स्पेनच्याच रेखावृत्तावर असलं तरी स्पेनहून एक तास मागे आहे. प्रशासकीयदृष्ट्या पोर्तुगाल एकूण १८ "डिस्ट्रिक्टस" (आपल्याकडचे "राज्य" याअर्थाने) जिल्हे आणि दोन स्वायत्त बेटं (अझोरा आणि मदिरा आयलँड्स) असा विभागला आहे. अटलांटिकमध्ये असलेल्या या दोन बेटांमुळे पोर्तुगालला समृद्ध असा १७ लाख चौरस किलोमीटरचा सागरी 'एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन ' प्राप्त झाला आहे, जो युरोपातील तिसरा आणि जगातील २० वा मोठा EEZ आहे.
पोर्तुगाल हे युरेशियन टेक्टॉनिक प्लेटच्या आयबेरियन पेनिन्सुलावर वसलेलं आहे. दक्षिणेकडून आफ्रिकन टेक्टॉनिक प्लेट ह्या युरेशियन प्लेटला धडक मारते आहे. शास्त्रज्ञ आणि जिऑलॉजिस्टसचा असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे की भविष्यात ह्या टेक्टॉनिक प्लेट ऍक्टिव्हिटीमुळे पोर्तुगाल कायम भूकंपछायेत राहील. इसवी सन १७५५ मध्ये 'ऑल सेंट्स डे 'च्या दिवशी आलेल्या एका अतिशय भयंकर भूकंप आणि त्सुनामीने पोर्तुगाल उध्वस्त झाला होता. पोर्तुगालच्या उत्तरेकडील भाग 'मेसेटा माउंटन्स ' आणि 'सेरा-दा- एस्टरेला ' ह्या दोन पर्वतराजींनी व्यापला आहे. पोर्तुगालमध्ये उत्तरेला सर्वाधिक लांबीची 'डोरो ' (Douro), मध्यभागात 'टॅगूस/ टॅघो ' (Tagus), आणि दक्षिणेला 'ग्वाडीयाना ' (Guadiana) ह्या ३ महत्वाच्या नद्या आहेत.
मदिरा आयलँड्सवर 'लॉरेल फॉरेस्ट्स ' हा युनेस्को नेचर झोन आहे. अझोरा आयलँड्स हे युरेशियन, आफ्रिकन आणि नॉर्थ अमेरिकन टेक्टॉनिक प्लेटवर वसलेलं आहे. आयलँड्सच्या ह्या खास भौगोलिक स्थानामुळे युरोपखंडातील हा एकमेव भाग असा आहे जिथे चहाचं नैसर्गिक उत्पादन होतं. देशांचा एक-त्रितीयांश भाग हा सदाहरित वनाने भरलेला आहे ज्यात ओक, पाईन आणि निलगिरी हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. पोर्तुगालमध्ये कागद आणि वाईन बॉटलच्या कॉर्कचे सर्वाधिक उत्पादन होते. पोर्तुगीझ लोकांना त्यांची वाईन सर्वाधिक प्रिय आहे. जगात सर्वप्रसिद्ध असणाऱ्या पोर्ट, रोझे, ग्रीन आणि मदिरा ह्या काही वाईन पोर्तुगालमध्ये उत्पादित केल्या जातात.
पोर्तुगालच्या राष्ट्रीय प्राणी (सिम्बॉल) हा ' बार्सिलोस रुस्टर ' हा एक लाल तुर्रेदार काल्पनिक कोंबडा आहे. पोर्तुगीझ लोक हे युरोपातील एक क्रमांकाचे (दरडोई) आणि जगात चार क्रमांकाचे (दरडोई) सी-फूड खवय्ये आहेत. ' काल-दो-व्हरडे ' ही सूपसारखं दिसणारी, वेगवेगळ्या प्रकारचे सी- फूड आणि meat घालून बनवलेली नॅशनल डिश आहे. ' पाष्टेश-दा-नाता ' किंवा ' पास्टेल-दि- नाता ' ही प्रसिद्ध हलवाई मिठाई आहे.
लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी आहे, इथे देशातलं मोठं एअरपोर्ट (लिस्बन इंटरनॅशनल ) आणि सी-पोर्ट (पोर्ट ऑफ लिस्बन ) आहे. सिंत्रा, पोर्तो आणि फारो ही अनुक्रमे मोठी शहरं आहेत. पण पोर्तो हे दुसऱ्या क्रमांकाचं व्यस्त एअरपोर्ट आहे. दक्षिणे दिशेला अटलांटिकमध्ये स्पेनच्या 'कनेरी आयलँड्स'च्या शेजारी असणारी, निर्मनुष्य ' सॅवेज आयलँड्स ' ही पोर्तुगाल डोमेनची सर्वात दक्षिण टोकं आहेत. या आयलँड्समध्ये असणारं " पॉण्टिना " हे खरंतर एक स्वयंघोषित ' मायक्रोनेशन ' आहे जे एका संगीतशिक्षकाने २००७ मध्ये खरेदी केलंय.
पोर्तुगिजांचं सागरी प्रेम सगळ्या जगाला माहिती आहे. जगातील नव्या भूभांगाच्या शोधाची सुरुवात करण्याचं श्रेय पोर्तुगीजांना जातं. अझोरा आणि मदिरा आयलँड्सच्या शोधाने युरोपातील 'एज ऑफ डिस्कव्हरी 'ला प्रारंभ झाला. पोर्तुगीजांची सागरीसत्ता इतकी अमर्याद होती कि, एकेकाळी पृथ्वीवरच्या पाचही खंडांमध्ये त्यांच्या वसाहती होत्या. पण समुद्रावरच्या प्रेमामुळे त्यांनी 'ब्राझील', 'अंगोला' आणि 'मोझाम्बिक' ह्या वसाहतींशिवाय कधीही किनारे सोडून आतील भागात वर्चस्व स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेला स्थान दिले नाही.
यामुळे १८व्या आणि १९व्या शतकात जिंकलेल्या कित्येक वसाहती, युद्धामुळे किंवा विकल्यामुळे त्याकाळातील इतर (ब्रिटन, फ्रान्स, जपान इत्यादी) सागरीसत्तांच्या हाती अलगद पडल्या. पण जगभर पोर्तुगिजांचा प्रभाव पडायचा थांबला नाही. हा प्रभाव आजही चीनमधल्या 'मकाऊ', भारतातल्या ' गोवा, दमण आणि दीव ' सारख्या ठिकाणी प्रकर्षाने पाहायला मिळतो. अश्या रंगीत आणि उष्ण देशात आम्ही जायचं नक्की केलं आणि २१ ऑक्टोबरला ब्रसेल्सच्या एअरपोर्टवरुन आम्ही लिस्बनच्या दिशेने प्रयाण केलं. आता पुढचे ६ दिवस आम्ही पोर्तुगालमधल्या महत्वाच्या शहरांमध्ये आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार होतो.
चेहऱ्यावर मास्कस, कानटोपी, अंगात दोन-दोन लेयर्स घालूनदेखील आम्ही कुडकुडत होतो, पण ओसंडून वाहणारा उत्साह आमच्या शिडात काही मावत नव्हता. ब्रसेल्स एअरपोर्टवर पोहोचेपर्यंतच गारठयाने आपली कमाल दाखवायला सुरुवात केली होती. मग भरपूर सेल्फी घेऊन आमच्या ट्रिपची सुफळ सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही.
थंडी इतकी होती की, गरमागरम पिझ्झा आणि सोबतीला बेल्जियन बिअर घेऊन आम्ही स्वतःला उबदार बनवण्याचे प्रयत्न चालू ठेवले. सायंकाळी ८ वाजता आमची फ्लाईट होती; जी लिस्बन इंटरनॅशनल एअरपोर्टला रात्री १० ला पोहोचणार होती. थंडीने लागलेली भरपूर भूक त्या गरम पिझ्झाने थोडीफार भागल्यानंतर आम्ही चेक-इनचे सारे सोपस्कार करुन फ्लाईटमध्ये बसलो.
दोन तासानंतर फ्लाईट ढगातून खाली उतरायला लागलं. तोपर्यंत जो काही थोडासा डोळा लागलाच होता (बिअरमुळे), तो कॅप्टनच्या अनाऊन्समेंटने उघडला. जरा भानावर येऊन खाली बघतो तो काय; लिस्बन एअरपोर्टवर घिरट्या घालताना लिस्बन शहराचं विहंगम दृश्य विमानाच्या खिडकीतून दिसत होतं. नुकत्याच झालेल्या अश्विन पौर्णिमेचा चंद्र रात्री आकाशातून अख्या शहराभर आपलं चांदणं वारेमाप उधळत होता. मनातल्या मनात खात्री पटली, की ट्रिप नुसती धमाल होणार आहे. पुढच्या कित्येक नवनवीन आणि समृद्ध अनुभवांचे आम्ही साक्षीदार होणार होतो. बहुधा हेच तो चंद्रदेखील सांगत होता!
आता पुढच्या ६ दिवसांत आमच्यासाठी हा पोर्तुगाल देश काय काय गुपितं उघडून ठेवणार आहे याची तीव्र उत्सुकता आणि भरपूर उत्कंठा होती. वातावरण जरा उबदार झालेलं होतं, घड्याळ एक तास मागे गेलेलं आणि आम्ही बुक केलेल्या हॉस्टेलकडे जाण्याच्या दिशेला झपाझप पाऊलं टाकत होतो. एअरपोर्टच्या बाहेर येऊन आम्हाला बस पकडायची होती. आमचं हॉस्टेल हे शहराच्या बऱ्यापैकी आतल्या भागात होतं. भरपूर रात्र झाली होती आणि आता होस्टेलवर जाऊन ताणून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी लिस्बन शहराची भटकंती करायची हेच केलेल्या प्लॅननुसार डोक्यात होतं. पण प्लॅननुसार असंच सगळं घडणार तरी होतं का ?
नक्की वाचा पुढच्या भागात !