आज २७ मे १९३८ साली भालचंद्र नेमाड्यांचा जन्मदिवस... नेमाड्यांची एकमेव कादंबरी मी वाचली ती म्हणजे 'कोसला'... ती ही अर्धवटच... कारण मनीच्या मृत्यूनंतर मला ती पुढे कधी वाचताच आली नाही... कित्येकदा मी कोसला संपवायचीच या निश्चयाने घेऊन बसलोय पण ती पूर्ण कधीच झाली नाही... हे कदाचित माझं अपयश असावं... माझ्याकडे चांगदेव चतुष्टयं, हिंदू - समृद्ध अडगळ वैगेरे अशी नेमाड्यांची बहुतांश पुस्तकं आहेत... आजतागायत ती आणली तशीच आहेत... कोसलाचा माझ्यावर फार काही प्रभाव आहे असं मला वाटत नाही कारण 'पांडुरंग सांगवीकर' मला कळूनही कधीच रिलेट झाला नाही... त्याची गोष्ट सांगण्याची काही एक विशेष पद्धत आहे एवढाच काय तो कोसला मला समजण्याशी मतलब... पांडुरंग सांगवीकरप्रमाणे मी देखील हॉस्टेलवर राहिलेलो आहे पण त्याच्या वागण्याची संगती मला कधीही लागली नाही... अर्थात हे म्हणणं धाडसाचं आहे कारण कादंबरीचा फक्त काही भाग वाचून मी त्यावर माझं मत देतोय असा प्रकार झाला...
नेमाड्यांचा देशीवाद मला कधी समजला नाही... कारण मी नव्वदोत्तरीच्या काळातील आहे आणि माझा युवाकाल हा २१व्या शतकातला आहे... ज्यावेगाने माझ्या पिढीने या अवकाशातील बदल आत्मसात केलेत ते जुनी पिढी फक्त ऑब्सर्व करणारी (पाहणारी या अर्थाने) असेल असं मला वाटतं... माझी पिढी ही अजूनही ट्रांझिशनमध्ये आहे... त्यामुळे हा सांप्रत बदल तिला संपूर्णपणे कळला असं म्हणता येणार नाही... पण ज्या पद्धतीच्या जाणिवा पांडुरंगच्या होत्या, त्या माझ्याही असतील असं वाटत नाही... म्हणून मला पांडुरंगाशी रिलेट होता येत नाही...
मनुचं प्रकरण मला हळवं वाटतं... तिच्यासाठी पांडुरंगाला काहीही करता येऊ नये ही त्याची हार आहे असं मला वाटतं... कुठेतरी जबाबदारी नाकारल्यासारखं... "Why I should bother?" अश्या टाईपचं... आणि म्हणून मला तो आवडेनासा होतो... अजिंठ्याचं प्रकरण मला नेहमी माझ्या स्वतःच्या अजिंठ्याच्या भेटींची आठवण करून देतं... मी आजतागायत तीनवेळा अजिंठा पाहिलंय... पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी १२ वर्षांचा होतो, त्यामुळे खूपच 'भारी ट्रीप' या इंप्रेशनशिवाय दुसरं काही नव्हतं... दुसऱ्या वेळी पाहिलं ते साधारण १८ -१९ चा असेल तेव्हा... खोजी बनून... आर्ट्स, हिस्टरी आणि ॲस्थेटिक्सचा विद्यार्थी म्हणून... तेव्हा अजिंठ्याची सौंदर्यस्थळं बघणं, त्याचा वर्ल्ड हेरिटेजशी संबंध आणि मानवी संस्कृतीच्या कलाकारीचं डेमॉंस्ट्रेशन असं कॉकटेल होतं... ते ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसर यांच्या टीमसोबत... तिसऱ्यांदा पाहिलं ते संपूर्ण एकटेपणाने, एकट्याने... ऍडव्हेंचर म्हणून गेलेलो असताना... सन २०१५-१६ च्या दरम्यान... ह्या तीनही वेळेस मला अजिंठा वेगवेगळ्या स्वरूपात दिसला, भावला, जाणवला, आठवता आला, अभ्यासता आला... पण कधीच पांडुरंग सांगवीकर सारखा नाही... का ? याचं कारण मी आजही शोधतोय... मला त्याच्यासारखंच दिसलं पाहिजे असा अट्टाहास नाही... कारण पांडुरंग आणि माझं भावविश्व वेगवेगळं आहे याची मला जाणीव आहे... म्हणूनच कदाचित मला कोसला संपूर्ण वाचता येऊ शकणार नाही...
Comments