top of page
Writer's pictureKaustubh Savatkar

मी बर्लिनमध्ये हरवलो तेव्हा...

" I am going to take a walk in the city ...!" ही phrase बर्लिनच्या बाबतीत अगदी खरी आहे. मोट्ठे मोट्ठे रस्ते आणि त्यावरून बिनधास्त चालण्यासाठी चांगले फूटपाथ हे मला सगळ्यात जास्त आवडलं इथे... पण सगळेच रस्ते इतके आखीव रेखीव की मला कित्येकदा आपण कुठल्या रस्त्यावरून चालतोय हेच कळेनासं होतं... सगळेच रस्ते सारखे दिसतात... कारण प्रत्येक रस्त्याला चालणाऱ्यांसाठी सिग्नलची व्यवस्था असते आणि कोणीच शिस्त मोडून रस्ते क्रॉस करत नाही... मग आपणही निमूटपणे सरळ रस्त्यातून सरळ चालतो... आणि इथले रस्ते सरळ असतात... I mean literally सरळ... सपाट पृष्ठभागाचे रस्ते... कुठेही चढउतार नसलेले रस्ते.. आणि खड्डे तर शोधूनही सापडणार नाहीत...


So, मी काल रात्री जेवणासाठी बाहेर पडलो आणि एका curry आउटलेट मध्ये गेलो... हे म्हणजे आपल्याकडे कसं "जोशी वडेवाले" वैगेरे असतं तसा टपरीवजा स्टॉल... पण कुठल्याही अँगलने ते टपरी वाटत नाही... खाऊन झाल्यावर मी परत हॉटेलच्या दिशेने निघालो आणि भलत्याच रस्त्याला लागलो... खूप पुढे चालत गेल्यावरही हॉटेल का बरं येईना असंच झालं मला... एकतर मोबाईलची बॅटरी गंडली होती त्यामुळे गुगल मॅप ही बघता येईना... बरं, रस्त्यावर कुणाला विचारावं तर एक चिटपाखरूसुद्धा नाही... माझं तोडकंमोडकं, कामचलाऊ जर्मन... कसं बोलणार? कुणाला विचारणार?... अन अश्या वेळी रस्त्यांची नाव पण वाचता येत नाहीत... "जाम फाटणे" हा प्रकार काय असतो ते अनोळख्या प्रदेशात हरवल्याशिवाय कळायचं नाही... थोडंसं पुढे, परत मागे असं चालत राहिलो... अन मग रस्ताच समजेनासा झाल्यावर भयंकर भांबावलो... जवळपास १२ डिग्री centigrade ला सुद्धा मला पाठीवरून ओघळ वाहतायत हे जाणवत होतं...


भयाण शांतता अन कोरडा रिकामा रस्ता... पाय गठाळून गेलेले आणि पोटात खड्डा... तिथेच फूटपाथवर बसलो ... लहान मुलं कसं पाय पसरून बसतात खूप रडून झाल्यावर तसंच... पाणी तर माझ्याही डोळ्यात दाटलं होतं... विशेष म्हणजे मला आता भीतीच वाटत नव्हती... मी शेवटचा एकदा मोबाईलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला अवलोकितेश्वरांचा वॉलपेपर दिसला... मनाचा हिय्या केला आणि " ओम मणी पद्मे हूँ " म्हटलं मनातल्या मनात... उठलो आणि चालायला लागलो... चालताना फक्त एवढंच आलं डोक्यात, बुद्धांनी आपल्या भिक्षूंना म्हटलं होतं, "चरथ भिक्कव्हे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय" ... कुठल्याही प्रदेशात, अनोळखी जागेत हे भिक्कू चालत रहा... लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या सुखासाठी... धम्म तुमचं रक्षण सदैव करत राहील...हे आणि फक्त हेच आठवत राहिलं... आणि कळलंही नाही की मी पुन्हा हॉटेलपाशी केव्हा पोहोचलो ते ... रूम उघडून आत गेलो आणि बेडवर कोसळलो तेव्हा मात्र माई-पप्पांची अतोनात आठवण झाली... मग मनसोक्त रडलो उशीत डोकं घालून...


सकाळी ७ वाजता अलार्म मला उठवत राहिला...


 


Comments


bottom of page